डॉ. अरुण प्रभुणे यांच्या विषयी . . .

Arun Photo

अरुण हा औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरच्या जिल्हा परिषद प्रशालेतून १९६४ मध्ये मट्रिक झाला. औरंगाबादच्या सरस्वतीभुवन कॉलेज मधून १९६९ मध्ये बी. ए. (मराठी) स्पेशल झाला. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठातून १९६९ मध्ये एम्. ए. (मराठी) तर १९८५ मध्ये पीच. डी. झाला.

डॉ. अरुण प्रभुणे हे १९७३ पासून लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक व संशोधनमार्गदर्शक होते. वीस वर्षे त्याच महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुखाचे पद भूषवून जुलै २००९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.

डॉ. प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे संशोधनप्रबंध पूर्ण केले असून पीच. डी. झाले आहेत.

डॉ. प्रभुणे यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. पौराणिक नाटक : नवा अन्वयार्थ (१९९७, प्रतिमा प्रकाशन, पुणे) व नॉर्थ अमेरिकन इंडिअन्सच्या अस्वललोककथा (२००६, पद्मगंधा प्रकाशन, पुणे). महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ् मयनिर्मितीच्या पुरस्कारांनी त्यांची ही दोन्ही पुस्तके सन्मानित आहेत.

वाङ् मयीन नियतकालिकांमधून त्यांचे समीक्षात्मक लेख प्रकाशित झाले आहेत तर दिवाळीअंकांमधून कथा प्रकाशित झाल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादांत वा विविध चर्चासत्रांत त्यांनी निबंध वाचन केले आहे.

२००७ ते २००९ ही दोन वर्षे ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोशाध्यक्षपदी विराजमान होते. याच महामंडळाच्या मराठी शुद्धलेखन समितीचे याच काळात ते सदस्य होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अक्षरयात्रा या वाङ् मयीन मुखपत्राचे संपादन त्यांनी २००७ ते २००९ या दोन वर्षांच्या काळात केले होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान या वाङ् मयीन नियतकालिकाच्या संपादक मंडळाचे ते दहा वर्षे सदस्य होते.

लोककथा वा दैवतकथा हा डॉ. प्रभुणे यांच्या कुतूहलाचा व म्हणूनच अभ्यासाचा विषय आहे. आजही याच क्षेत्रात त्यांचे संशोधन चालू आहे. पाऊसनॉर्थ अमेरिकन इंडिअन्सनी सांगितलेल्या खागोलास्थ महा अस्वलाच्या नक्षत्रलोककथा या संशोधन प्रकल्पावर सध्या त्यांचे काम चालू आहे.