सौ. उषा अरुण प्रभुणे यांच्या विषयी...

 

Usha Photo

 

सौ. उषा प्रभुणे या लग्नापूर्वीच्या कु. पुष्पलता जनार्दन पानसे. त्यांच्या वडिलांचे नाव जनार्दन वामन पानसे तर आईचे नाव इंदूताई जनार्दन पानसे. शांडिल्य गोत्रीय देशस्थ ऋग्वेदी पानसे घराणे मूळचे वाई तालुक्यात असलेल्या पसरणी या गावचे. जनार्दनराव हे निझाम राजवटीत पी.डब्ल्यू.डी. खात्यात सिव्हिल इंजिनिअर होते. डेप्युटी इंजिनिअर या पदावरून सेवानिवृत्त होऊन औरंगाबाद येथे ते स्थायिक झाले.

औरंगाबादच्या मुलींच्या सरकारी शाळेतून १९६६ मध्ये पुष्पलता ट्रिक झाली तर देवगिरी महाविद्यालयातून १९७० मध्ये बी.एस् सी. झाली.

शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर उत्कृष्ट खो खो प्लेअर म्हणून पुष्पलता नेहमी चमकत राहिली. आंतर महाविद्यालयीन व विद्यापीठीय स्तरावर खो खो खेळून वेगवान खेळाडू म्हणून तिने सतत नावलौकिक मिळवला. १९६८ ते १९७० या काळात पुष्पलता मराठवाडा विद्यापीठाची खो खो मधील कलर होल्डरही होती !

१९७२ मध्ये तिचा विवाह झाल्याने ती सौ. उषा अरुण प्रभुणे झाली. विवाहापूर्वीची सेन्ससमध्ये असलेली नोकरी सोडून व पुन्हा कधी नोकरी करण्याचा विचारही न करून तिने आपले लक्ष संसार व मुलांवर केंद्रित केले. गृहिणीधर्माचे पालन करून आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श माता व आदर्श गृहिणी म्हणून नाव कमावले. सामाजमान्यता मिळविली.

संवेदनक्षमता, सहानुभाव, जीवनासक्ती, ममत्व व प्रेमभाव या गोष्टी उषाला नीरस व रुक्ष जगू देत नाहीत. काव्यनिर्मितीला प्रवृत्त करणाऱ्या या गोष्टींमुळे ती कवितांना जन्म देते. काव्यसृजनाचा आनंद उपभोगते. नानाविध रंगसंगतींनी युक्त असणाऱ्या सुंदर रंगवलींना जन्म देते. रसिकांना लुभावते.