मनाची समजूत घालत मी इथे राहतोय
आशेचा किरण मध्येच चमकताना पाहतोय
पाहता पाहता चार वर्षे गेली.
येणाऱ्या संधीची मी वाट बघितली
पण मेहनतीला माझ्या फळ येत नाही
अजून नशीब काही खुलत नाही
क्वालिफाइड मी होऊ शकत नाही
त्या शिवाय मला कुणी विचारत नाही.

देवाला मी सणाच्या दिवशी नमस्कार करतो
पण तो मनापासून नाही हे मी जाणतो.
खरे म्हणजे मी सगळ्यालाच वैतागलोय
आयुष्याचा पुढचा खेळ काय असेल
हे आजमावण्याचा प्रयत्न करतोय
सगळे जण म्हणतात, “धीर धर, धीर धर.”
मोठ्या लोकांच्या आयुष्याकडे जरा बघ.
त्यांनी खूप मेहनत केली, वाट बघितली
आणि मग यशाची मजा चाखली.”
तुझ्या गुणांचे चीज होईल असाही दिवस लवकर येईल
तेव्हा तुझा तूच आश्चर्यचकित होशील.
भाग्याचा तुझा तूच हेवा करशील.”

हे सगळे ऐकायला छान वाटतेय
पण आई आससून माझी पैसे मिळवण्याची वाट पाहतेय
ते ही मला दिसतंय.
मात्र लख्ख प्रकाश होण्याची वाट पाहतोय…वाट पाहतोय.

सौ.उषा प्रभुणे
उदगीर, भारत
सोमवार, ऑक्टोबर १०, २००५

© २००५ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2005 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com