पंचविसावा वाढदिवस लग्नाचा,
इच्छा असून राहून गेला करायचा.
आमच्या वयाची पन्नाशी आली,
अचानक मुलांनी हवाई बेटांची तिकिटे
आमच्या हातात दिली.
प्रवासाची सगळी तयारी झाली,
कसे होईल आमचे म्हणून
भीती वाटू लागली.
चेहरा आमचा सुकून गेला,
भाषेचा ताण वाटू लागला.
हातात हात घालून निघालो,
सगळ्यांना ‘टाटा’ म्हणालो.
हवाई बेटांनी स्वागत केले,
भाषेचे आमचे टेन्शन गेले.
प्रत्येक बेट पहातांना आनंद झाला,
फोनने आम्ही तो मुलांना कळवला.
स्नॉर्कलिंग केले, सायकलिंग केले,
सबमरीनने आम्हाला समुद्राच्या तळाशी नेले.
लाव्हा रस पहायला निघालो,
दमलो म्हणून परत फिरलो.
मन माझे नाराज झाले,
जमले नाही म्हणून वाईट वाटले.
पॅरासेलिंगची आधी भीती वाटली,
पुन्हा मग आम्ही पतंगाची मजा अनुभवली.
बाराशे फूट उडालो, परत ने म्हणून म्हणालो.
हेलिकॉप्टरने आम्हाला फिरवले,
सृष्टीचे सौंदर्य दाखवले.
बोटीने आम्ही निघालो,
समुद्राच्या आत आत जाऊन आलो.
वरून बघितले, पाण्यातून बघितले,
बेटांनी त्यांचे सौंदर्य उलगडून दाखवले.
मन आमचे हिरवेगार झाले.
पॉलिनेशेन टूर सातव्या दिवशी घेतली,
पहिल्या रांगेत बसून नाचगाणी पाहिली.
शंखांची माळ घातली, फुलांची माळ घातली,
प्रत्यक्ष नाचून आगळी गंमत अनुभवली.
पाहता, पाहता आठ दिवस झाले,
निघायचे आम्हाला वेध लागले.
‘आऽलोऽहाऽ’ म्हणून स्वागत झाले,
‘महाऽलोआऽ’ म्हणून निरोप घेतले.
मुलांची भेट आम्ही अशी स्वीकारली,
कशी होती ती तुम्हाला दाखवली.

सौ. उषा प्रभुणे
हवाई, अमेरिका
मे १०, २००१

© २००१ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2001 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com