वैजापूर : घर – १

या घरात मी पहिले पाऊल टाकले
तेव्हाच घराने मला आपलेसे केले
पहिले लाजणे याच घराने पाहिले
संसारात मला तृप्त यानेच केले
घराचे वर्णन कसे करू ?
जणू माझ्यासाठी ते कल्पतरू
शब्दांच्या पलीकडे त्याचे माझे नाते
आता मात्र फक्त आठवणीतच ते मला दिसते.

सौ. उषा प्रभुणे
सोमवार, ऑगस्ट ८, २००५

वैजापूर : घर – २

किती आठवणी मनात येती
आनंदाचे दिवस आठवती
ह्या घराने काय नाही दिले ?
चांगले सासरे चांगल्या सासूबाई.
चांगला नवरा चांगला संसार
चांगली मुले चांगल्या सुना
चांगली नातवंडे
या अंगणाने आमच्या तीन पिढ्या पाहिल्या
या अंगणाने छोट्यांना पाहिले पाऊल टाकायला शिकवले
पंखात बळ येताच जगात जायला लावले.

सौ. उषा प्रभुणे
गुरुवार, ऑगस्ट, २५, २००५

वैजापूर : घर – ३

किती त्याला सांभाळले, किती त्याचे कौतुक केले
वाटले होते, आपला शेवटही इथेच या घरातच व्हावा
पण काळ बदलला, जग बदलले
हेच घर आता वेगळे भासू लागले.
ह्याला आता संभाळता येणार नाही याची खात्री पटली
गावाकडे जाणे होईना, घराकडे पाहणे होईना.
मनाची तगमग होऊ लागली, सारखी काळजी वाटू लागली.
शेवटी आम्ही आमच्याच मनाला घर विकायची परवानगी मागितली.
शेवटी तो दिवस आला.
आम्ही जड अंतःकरणाने पण आनंदाने चांगले घर दुसऱ्याच्या हातात दिले
आणि त्याला म्हटले,
“आता बाबा, तोच तुझा पालनकर्ता. तोच तुझा भाग्यविधाता.”
तरीसुद्धा अजूनही वाटते
ते लोक नीट सांभाळतील ना ?
माझ्या घराकडे चांगले बघतील ना ?

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
गुरुवार, ऑगस्ट, २५, २००५

© २००५ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2005 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com